बाप्पाच्या स्वागतासाठी पोलिसांचा ‘पारंपरिक’ बाणा

डॉल्बीला बंदी; आगमनासाठी ५ दिवस निश्चित करणार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात सातारा शहरातील गणेश आगमन मिरवणुका पारंपरिक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. आगमन मिरवणुकांमध्ये डॉल्बीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, केवळ पारंपरिक वाद्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसेच गणेशचतुर्थीपूर्वीचे कोणतेही पाच दिवस आगमन मिरवणुकांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत गणेशोत्सव समन्वय समितीच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अलंकार हॉल येथे सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माने यांच्यासह मोठ्या संख्येने गणेश मंडळांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

बैठकीत आगमन मिरवणुकांच्या नियोजनासंदर्भात गणेश मंडळांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी आगमन मिरवणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत डॉल्बीचा वापर होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्याऐवजी ढोल-ताशा, लेझीम व अन्य पारंपरिक वाद्यांच्या साथीनेच मिरवणुका काढाव्यात, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले. या सूचनांना सर्व गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत डॉल्बीचा वापर टाळण्याची ग्वाही दिली.

आगमन मिरवणुकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पाच दिवसांचे अंतिम वेळापत्रक रविवारी गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक मंडळाच्या आगमनाची तारीख ठरवून पोलिस प्रशासनाकडून वाहतूक, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेचे स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे. आगमन मिरवणुका सुरळीत, सुरक्षित आणि वेळेत पार पडाव्यात, यासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

याशिवाय, मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक गणेश मंडळाने आगमन मिरवणुकीपूर्वी संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आवश्यक परवानगी व पत्रव्यवहार पूर्ण करावा, अशा सूचनाही पोलिस प्रशासनाने दिल्या. निश्चित करण्यात येणाऱ्या पाच दिवसांव्यतिरिक्त आगमन मिरवणूक काढल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

दरम्यान, गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक सलोख्याचा उत्सव असून, तो शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता यंदाचा गणेश आगमन सोहळा शिस्तबद्ध आणि पारंपरिक वातावरणात पार पडेल, असा विश्वासही उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांनी व्यक्त केला

error: Content is protected !!