जलसंपदा मंत्र्यांनी दिली राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती

मुंबई, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पश्चिम महाराष्ट्राची जीवनवाहिनी आणि राज्याच्या जलविद्युत निर्मितीचा प्रमुख आधार असलेल्या कोयना धरणाच्या ‘शिवाजीसागर’ जलाशयाच्या नावाचा विस्तार करून ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे अधिकृत नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी याची माहिती दिली.
कोयना धरणामुळे निर्माण झालेला विस्तीर्ण जलाशय अनेक वर्षांपासून ‘शिवाजीसागर’ किंवा ‘शिवाजी सागर’ या नावाने ओळखला जातो. त्यामुळे जलाशयाला प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलेले नसून, पूर्वीच्या नावाचा सन्मानपूर्वक विस्तार करण्यात आला आहे. महाराजांचा एकेरी उल्लेख टाळून त्यांच्या पूर्ण नावाने जलसागराची ओळख व्हावी, अशी मागणी शिवप्रेमी नागरिक आणि विविध संघटनांकडून होत होती.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता. जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिल्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ हे अधिकृत नाव निश्चित करण्यात आले. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे यापुढे शासनाच्या पत्रव्यवहारासह संबंधित शासकीय अभिलेख आणि नोंदींमध्ये कोयना जलाशयाचा उल्लेख नव्या विस्तारित नावाने करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे. सिंचन आणि पाणीपुरवठ्याबरोबरच राज्याच्या जलविद्युत निर्मितीच्या दृष्टीने कोयना प्रकल्पाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सह्याद्रीच्या कुशीत विस्तारलेल्या या जलसागराला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव मिळाल्याने त्याच्या ओळखीला ऐतिहासिक आणि सन्मानपूर्ण अधिष्ठान मिळाले आहे.
नामविस्ताराच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याबद्दल जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
शिवप्रेमींकडून निर्णयाचे स्वागत
दरम्यान, ‘शिवाजी सागर’ या नावाचा विस्तार करून ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नाव निश्चित करण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराजांचा पूर्ण आणि सन्मानपूर्वक उल्लेख झाल्याबद्दल या निर्णयाचे स्वागत होत आहे.
You must be logged in to post a comment.