साहित्य म्हणजे माणुसकीची साधना : निलेश महिगावकर

‘बाभळी कॉलिंग’ कादंबरीवर विचारमंथन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : “कोणतीही श्रेष्ठ कलाकृती एका रात्रीत जन्म घेत नाही. तिच्या निर्मितीमागे वर्षानुवर्षांची तपश्चर्या, चिंतन, मनन आणि कठोर परिश्रम असतात. समाजातील बदलते वास्तव, संघर्ष, विषमता आणि ताणतणाव यांचे निरीक्षण करूनच साहित्यिक कलाकृती घडवली जाते. चांगला लेखक घडविणे हे साहित्याचे उद्दिष्ट नाही, तर चांगला माणूस घडविणे हेच साहित्याचे श्रेष्ठ प्रयोजन आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कादंबरीकार निलेश महिगावकर यांनी केले.

येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील भाषा मंडळ आणि मराठी विभागातर्फे बी.ए. भाग–३ च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातील निलेश महिगावकर लिखित ‘बाभळी कॉलिंग’ या कादंबरीवर अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त साहित्यचर्चा कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रियांका कुंभार यांनी करून दिला. प्रसिद्ध संवादलेखक विशाल कदम आणि प्रा. निरंजन फरांदे यांनी ‘बाभळी कॉलिंग’ कादंबरीवर समीक्षात्मक मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांनी भूषविले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निलेश महिगावकर म्हणाले, ‘बाभळी कॉलिंग’मधून मी माझ्या गावातील माणसांचे संघर्ष, वेदना, भ्रष्टाचाराने किडलेली समाजव्यवस्था, नात्यातील तुटलेले माणूसपण आणि अजूनही शिल्लक असलेली माणुसकी यांचा शोध घेतला आहे. सामाजिक वास्तव आणि मानवी मूल्यांचा प्रामाणिक दस्तऐवज या कादंबरीतून साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.

“अध्यक्षीय भाषणात डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले, “साताऱ्यातील साहित्यिकाची कलाकृती अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याने विद्यार्थ्यांना सृजनशील लेखनासाठी प्रेरणा मिळेल. ‘बाभळी कॉलिंग’मधील पात्रे आणि प्रसंगांमधून समाजातील उपेक्षित घटकांचे वास्तव विद्यार्थ्यांना अधिक जवळून समजेल. त्यामुळे त्यांनी अशा कलाकृतींचा अभ्यास करून सामाजिक जाणिवा प्रखर कराव्यात.”

या कार्यक्रमाला इर्जिक प्रकाशनचे प्रकाशक हरीश भोसले, तानाजी मालुसरे, दैनिक सकाळचे पत्रकार स्वप्नील शिंदे, कवी शशिकांत बडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थिनी पियुषा भोसले, तनुजा चव्हाण, ऐश्वर्या भोसले आणि माधवी जगदाळे यांनी चर्चासत्रात उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशाली शिंदे हिने केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संजयकुमार सरगडे यांनी केले. समन्वयक म्हणून प्रा. प्रियांका कुंभार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

error: Content is protected !!