सात गुन्ह्यांची कबुली; लाखोंचा ऐवज जप्त

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरासह शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रांवर डल्ला मारून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या सराईत साखळीचोराला अखेर सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (डी.बी.) अटक केली. या कारवाईत तब्बल सात साखळीचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून १२ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास प्रतापसिंहनगर परिसरातील सिद्धीविनायक मंगल कार्यालय ते अश्विनी पार्क या रस्त्यावरून एक महिला पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. या घटनेनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.महिलांना लक्ष्य करून गर्दीच्या भागात घडणाऱ्या अशा गंभीर साखळीचोरीच्या घटनांची दखल घेत वरिष्ठांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या.
सीसीटीव्हीने दिला आरोपीचा माग
घटनास्थळांसह परिसरातील सीसीटीव्ही चित्रफितींचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तपासादरम्यान सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच पद्धतीने घडलेल्या सात साखळीचोरीच्या घटना समोर आल्या. सर्व घटनांतील संशयित एकच असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी पुणे-सातारा महामार्गावरून साताऱ्यात येऊन चोरी करून पुन्हा त्याच मार्गाने परत जात असल्याची माहितीही तपासातून पुढे आली.
या माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने आनेवाडी-पाचवड परिसरात सापळा रचला. ४ ऑगस्ट रोजी पाचवड येथे संशयित श्रीपाद ज्ञानेश्वर लोळगे (वय ३७, रा. साईविश्व अपार्टमेंट, पाचवड, ता. वाई) याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीकडे पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने सातही गुन्ह्यांची कबुली दिली.

सात गुन्ह्यांची कबुली
आरोपीने सातारा शहर पोलीस ठाण्यातील चार, सातारा तालुका पोलीस ठाण्यातील एक आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यातील दोन अशा एकूण सात साखळीचोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. या सर्व गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेली सोन्याची मनी मंगळसूत्रे पोलिसांनी जप्त केली असून त्यांची एकूण किंमत १२ लाख ७५ हजार रुपये आहे.
विविध पथकांच्या समन्वयातून यश
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाने ही कारवाई यशस्वी केली. कारवाईत सातारा शहर डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अशोक सावंजी, निलेश जाधव, विक्रम माने, निलेश यादव, प्रविण कडव, मनोज मदने, महेश बनकर, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, वैभव माने, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सुशांत कदम आणि सचिन रिटे यांनी सहभाग घेतला.
तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकातील सुरेश घोडके, निलेश काटकर, मनोज मदने, महेश बनकर, अभय साबळे, विशाल धुमाळ, सचिन पवार, स्वप्निल सावंत, रोहित बाजारे, सुमित मोरे आणि संग्राम फडतरे, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे प्रशांत मोरे, रामदास भास्करवाड आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कुशल वाळुंजकर यांनीही या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.
You must be logged in to post a comment.