साताऱ्यात १ मेपासून डिजिटल जनगणनेचा श्रीगणेशा

‘स्वगणनेची’ची सुविधा; २५ प्रभागांत ३०० गणकांची नियुक्ती

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सातारा शहरात यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जनगणना प्रक्रिया राबविण्यात येणार असून, या मोहिमेला १ मेपासून अधिकृत सुरुवात होणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार असल्याने पारंपरिक कागदी जनगणनेऐवजी तंत्रज्ञानाधारित नवी प्रणाली शहरात लागू होत आहे. सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा जनगणना चार्ज अधिकारी विनोद जळक यांनी ही माहिती दिली.

भारत सरकारचे महा निबंधक तसेच महाराष्ट्र शासन जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असून, नागरिकांची सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याविषयक माहिती संकलित केली जाणार आहे. भविष्यातील विकास आराखडे, शासकीय योजना आणि संसाधनांचे योग्य नियोजन करण्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ही संपूर्ण जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘स्व-गणने’चा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिक स्वतः आपल्या कुटुंबाची माहिती, घराची स्थिती, उपलब्ध सुविधा तसेच मालमत्तेची माहिती ऑनलाइन भरू शकणार आहेत. यानंतर दुसऱ्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त गणक प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांनी ऑनलाइन माहिती भरली नसेल, त्यांच्यापर्यंत प्रशासन थेट पोहोचणार आहे.

सातारा शहरातील सर्व २५ प्रभागांमध्ये ही मोहीम राबविण्यासाठी प्रशासनाने ३०० गणक गटांची निर्मिती केली आहे. प्रत्येक गटाकडे साधारणतः १८० ते २०० घरे आणि ७०० ते ८०० नागरिकांची माहिती संकलनाची जबाबदारी असणार आहे.

या उपक्रमासाठी प्रशासनाने २२५ गणक आणि ५० पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून, त्यांना २३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. डिजिटल प्रणाली प्रभावीपणे हाताळण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे मानले जात आहे.

जनगणना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाणार असून, भविष्यातील विविध शासकीय प्रक्रियांसाठी हा क्रमांक उपयुक्त ठरणार आहे. या प्रक्रियेदरम्यान नागरिकांना एकूण ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.

ही प्रक्रिया केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरती मर्यादित नसून शहराच्या भविष्यातील विकासाचा पाया ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी तथा जनगणना चार्ज अधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.

error: Content is protected !!