पोक्सो न्यायालयाकडून विविध कलमांन्वये ६५ हजार दंड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी गणेश ऊर्फ चिक्या दिनकर गायकवाड (वय २७, रा. दहिवडी, ता. माण) याला वडूज येथील विशेष पोक्सो न्यायालयाने पोक्सो कायद्यान्वये एकूण १५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विविध कलमांन्वये एकूण ६५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दरम्यान, गायकवाड याला २०१७ मधील अन्य एका पोक्सो प्रकरणातही पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिवडी पोलीस ठाण्यात ६ डिसेंबर २०२१ रोजी याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत शाळेतून घरी जात असताना गायकवाड याने तिचा पाठलाग केला. त्यानंतर तिचा हात धरून विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार दहिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी या प्रकरणाचा तपास करून गायकवाड याच्याविरुद्ध वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजित कदम-साबळे यांनी काम पाहिले.सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी आणि युक्तिवाद विचारात घेऊन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष पोक्सो न्यायाधीश विद्याधर काकतकर यांनी गायकवाड याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
न्यायालयाने पोक्सो कायद्याच्या कलम ८ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड, कलम ९ (टी) सह कलम १० अन्वये सात वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड, तर कलम १२ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, विविध कलमांखाली एकूण १५ वर्षे सक्तमजुरी आणि ६५ हजार रुपये दंडाची शिक्षा नमूद करण्यात आली आहे.
‘पोक्सो’चा दुसऱ्यांदा दणका
गायकवाड याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. उपलब्ध माहितीनुसार, २०१३ मधील खुनाच्या प्रयत्नाच्या (कलम ३०७) प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. २०१५ मधील पोक्सो प्रकरणातूनही तो निर्दोष सुटला होता. मात्र, २०१७ मधील पोक्सो प्रकरणात त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. ही शिक्षा भोगून आल्यानंतर २०२१ मध्ये त्याच्याविरुद्ध पुन्हा पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला. आता या प्रकरणात त्याला १५ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या तपास व न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत आणि सहायक पोलीस निरीक्षक भागवत गोसावी यांनी मार्गदर्शन केले. महिला पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.
You must be logged in to post a comment.