गोठ्यातून जनावरे चोरून विकणारी टोळी गजाआड

बेंदरादिवशीच कारवाई; आता गाई-म्हशींचा शोध

वाई, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शेतकरी आपल्या लाडक्या जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बेंदूर सण साजरा करत असतानाच, गोठ्यांवर डल्ला मारून म्हशी आणि गायी पिकअपमधून पळविणाऱ्या टोळीच्या मुसक्या भुईंज पोलिसांनी आवळल्या. वाई तालुक्यातील विविध गावांतून सहा जनावरे चोरून ती पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील गुरांच्या बाजारात विकल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहनही जप्त करण्यात आले आहे.

सुरेश ऊर्फ सूर्यकांत आनंदराव चव्हाण (वय ३५, रा. पाचवड), संदेश हणमंत पिसाळ (वय २७, रा. व्याजवाडी) आणि हर्षद हिंदुराव चव्हाण (वय १८, रा. कडेगाव, ता. वाई) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

कवठे (ता. वाई) येथील किरण नानासो पोळ यांच्या गोठ्यातून १९ जूनच्या रात्री मुऱ्हा जातीच्या दोन म्हशी चोरीला गेल्या होत्या. पोळ यांच्या तक्रारीवरून भुईंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या गोठ्यांतून जनावरे चोरीला जाण्याच्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी विशेष पथक तयार केले. पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा माग काढला. संशयित पिकअपमधून वाईकडून पाचवडच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाचवड चौकात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

चौकशीत संशयितांनी कवठे येथील दोन म्हशी, ओझर्डे येथील एक म्हैस, खडकी येथील एक जर्सी गाय आणि कुडाळ येथील दोन म्हशी अशा एकूण सहा जनावरांची चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेली जनावरे चाकण (जि. पुणे), काष्टी-श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) आणि सांगोला (जि. सोलापूर) येथील गुरांच्या बाजारात विकल्याचेही चौकशीत समोर आले.

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन जप्त केले आहे. आरोपींना अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आली असून चोरीची जनावरे कोणत्या व्यापाऱ्यांना विकली, याचा शोध घेत ती परत मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या चोरीच्या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे. बेंदूर सणाच्या दिवशीच जनावरचोरांची टोळी जेरबंद झाल्याने भुईंज, कुडाळ, बावधनसह परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस हवालदार नितीन जाधव, धायगुडे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते आणि किरण निंबाळकर यांनी केली.

error: Content is protected !!