जितेंद्र डूडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डूडी यांची अठरा महिन्यांची कार्यकिर्द साताऱ्यात अत्यंत उल्लेखनीय ठरली असून, त्यांच्या कार्याने जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर ७ जून २०२३ रोजी त्यांच्या जागेवर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागली होती.
गेल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात डूडी यांनी अनेक लोकाभिमूख निर्णय घेवून जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली होती. महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमध्ये बोकाळलेल्या अतिक्रमणांविरोधात डूडी यांनी खमकी भूमिका घेऊन ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती. तसेच कास येथील अतिक्रमणांविरोधातही डूडी यांनी हातोडा उगारलेला होता. स्मार्ट शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुधारणा, गौण खनिज महसूलवाढ, तसेच न्यू महाबळेश्वर प्रकल्पातील प्रक्रियेस गती देणे यांसारखी महत्त्वाची कामे त्यांनी केली. लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे नियोजनही त्यांनी नेटकेपणे पार पाडले.
दरम्यान, आज राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार डूडी यांची बदली पुणे जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संतोष पाटील यांचा कार्यकाल
संतोष पाटील हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उंडेगावचे रहिवासी आहेत. त्यांनी १९९६ साली उपजिल्हाधिकारी म्हणून यवतमाळ येथे आपल्या प्रशासकीय प्रवासाला सुरुवात केली. २०१६ ते २०१८ या काळात ते नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी होते. २०२० मध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर मार्च २०२४ पासून त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले.
डूडी व पाटील दोघेही लवकरच नवीन जबाबदाऱ्या स्वीकारतील, अशी माहिती अप्पर सचिव व्ही. राधा यांनी दिली आहे.

You must be logged in to post a comment.