सामर्थ्य सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने ऐतिहासिक परंपरेला उजाळा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सामर्थ्य सोशल फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. साताऱ्यातील नाना-नानी पार्क येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने ऐतिहासिक परंपरेला उजाळा देत विविध मान्यवरांनी छ. संभाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाची सुरुवात भूमिशिल्पचे संपादक पद्माकर सोळवंडे यांच्या हस्ते येथील छ. संभाजी महाराजांच्या शिल्पाला हार अर्पण करून करण्यात आली. या वेळी सामर्थ्य सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. गणेश चोरगे, पत्रकार अमित वाघमारे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश खंडूझोडे, विक्रम फडतरे, ओमकार काकतिकर आणि महेश कांबळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा व त्यागाचा गौरव करण्यात आला. छ.शंभूराजेंच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ऐतिहासिक महत्त्वावर उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले.या प्रसंगी, “छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे,” असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता महाराजांच्या जयघोषाने झाली.
दरम्यान, सामर्थ्य सोशल फाऊंडेशन सातत्याने ऐतिहासिक परंपरांचे जतन व प्रचार-प्रसारासाठी कार्यरत असून, अध्यक्ष ॲड.गणेश चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज छ. शंभूराजेंच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

You must be logged in to post a comment.