वाई पंचायत समितीचा पर्यावरणपूरक उपक्रम, महिलांनी केला प्लास्टिकमुक्त जीवनाचा संकल्प

वाई, (भूमिशिल्प वृत्तसेवा): प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महिलांनी यापुढे प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवून पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर सुरू करावा, असे आवाहन गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांच्या पत्नी रुपाली परिट यांनी केले.
वाई पंचायत समितीमध्ये आयोजित हळदीकुंकू समारंभात वाण म्हणून कापडी पिशव्या वाटण्यात आल्या.सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या वाई पंचायत समितीने महिलांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करण्यासाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. रुपाली परिट यांच्या संकल्पनेतून महिला कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन या उपक्रमाची मांडणी केली.

महिलांना प्लास्टिकमुक्त जीवनाचा संदेश देताना रुपाली परिट म्हणाल्या, जगभर प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. कॅरी बॅगचा वापर आता बंद करण्याची वेळ आली आहे. पर्यावरणपूरक कापडी पिशव्या आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्यास निसर्गाचे रक्षण करता येईल. यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करून इतरांनाही प्रेरणा दिली पाहिजे.

परिट यांनी प्लास्टिकच्या घातक परिणामांवर प्रकाश टाकत कापडी पिशव्या वापरणे हा पर्यावरणासाठी आदर्श ठरेल, असे सांगितले. त्यांनी महिलांना कापडी पिशव्या वापरण्याचे फायदे समजावून सांगितले आणि त्यांच्या या सकारात्मक भूमिकेला उपस्थित महिलांनी पाठिंबा दिला.
समारंभाच्या यशस्वितेसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका रुपाली कुदळे, वयगाव ग्रामपंचायत अधिकारी श्रीदेवी नुले यांच्यासह पंचायत समितीच्या महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी मेहनत घेतली. या उपक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

You must be logged in to post a comment.