सातारा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

अध्यक्षपदी अजय कदम, उपाध्यक्षपदी विजय जाधव, कार्याध्यक्षपदी बाळू मोरे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या अंतर्गत असलेल्या सातारा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी पत्रकार अजय कदम यांची अध्यक्षपदी, बाळू मोरे यांची कार्याध्यक्षपदी, विजय जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुनील साबळे, प्रवीण राऊत कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडले गेले, तर शिवाजी कदम यांची मार्गदर्शक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीच्या वेळी महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हरीष पाटणे यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या जडणघडणीत पत्रकारितेचा मोठा वाटा राहिला आहे. पत्रकारितेच्या संघटनात्मक वाटचालीत आम्ही जिल्हा पत्रकार संघाची बांधणी करून जिल्हा पत्रकार भवनाची निर्मिती केली. पत्रकारांचे आंदोलन, सामाजिक उपक्रम, गरजू पत्रकारांना मदत असे काम जिल्ह्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने करून सातारा जिल्ह्यात पत्रकार संघाचा आदर्श उभा केला. तर राज्य शासनाच्या पत्रकार अधिस्विकृती समितीच्या माध्यमातून जेष्ठ व वयोवृद्ध पत्रकारांना त्यांच्या घरी जाऊन अधिस्वीकृती पत्र दिले जाणार असल्याचे सांगून ते म्हणाले, सातारा तालुक्यातील पत्रकारांनी जिल्ह्याच्या आदर्श पत्रकारितेची वाटचाल सक्षमपणे पुढे चालवावी. सामाजिक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने सर्वोत्तम योगदान द्यावे. तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची झालेली बिनविरोध निवड ही अभिमानास्पद असून जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही हरीष पाटणे यांनी दिली.

सातारा पत्रकार संघाचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांनी पत्रकारांना कर्तृत्वाने सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याची आवश्यकता सांगितली आणि तालुका पत्रकार संघाला समाजसेवा आणि पत्रकारितेतील आदर्श मूल्ये जपण्याचे सूचित केले.

नवनिर्वाचित अध्यक्ष अजय कदम यांनी, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पत्रकार संघाच्या लौकिक वाढविण्यासाठी सर्व पत्रकारांना एकत्र करून कार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी सचिवपदी राहुल ताटे- पाटील, सहसचिव गुलाब पठाण, खजिनदार वसंत साबळे, संघटक नितीन साळुंखे, कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रविण राऊत, प्रमिला साबळे, विकास जाधव, सतिश जाधव, संतोष यादव, निलेश रसाळ आणि मिलिंद लोहार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नवीन पदाधिकाऱ्यांचा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे आणि सातारा पत्रकार संघाचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी तालुक्यातील विविध दैनिक आणि साप्ताहिकांचे पत्रकार उपस्थित होते. प्रास्ताविक विजय जाधव यांनी केले, तर आभार वसंत साबळे यांनी मानले.

error: Content is protected !!