सातारा न्यायालयाने ठोठावला प्रत्येकी २ लाखांचा दंड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : तब्बल ८६ किलो १०० ग्रॅम गांजाची बेकायदा वाहतूक करून विक्रीच्या उद्देशाने ताब्यात बाळगल्याप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांना २० वर्षे सक्त कारावास आणि प्रत्येकी दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोघांनाही प्रत्येकी आणखी दोन वर्षे साधा कारावास भोगावा लागणार आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी (डीजे-२) यांनी सोमवारी (दि. २०) हा निकाल दिला.
लक्ष्मण अंकुश जाधव (वय ३२) आणि शंकर विलास जाधव (वय ३६, दोघे रा. पळशी, ता. खटाव, जि. सातारा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. एनडीपीएस कायद्याच्या कलम २० (बी) (ii) (सी) अंतर्गत दोघांना दोषी ठरविण्यात आले.
या प्रकरणाची सुरुवात ७ फेब्रुवारी २०१९ रोजी झाली होती. तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दुपारी पावणेतीनच्या सुमारास कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपींकडून ५ लाख १६ हजार ६०० रुपये किमतीचा ८६ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याचबरोबर यामाहा मोटारसायकल, सेंट्रो कार, दोन मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ७३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने त्याची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले होते.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. सी. पोरे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गौरी मुरलीधर लकडे यांनी कामकाज पाहिले.
खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण आठ साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षी, परिस्थितीजन्य पुरावे तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित न्यायनिर्णयांचे दाखले न्यायालयासमोर सादर करण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत २० वर्षे सक्त कारावास व प्रत्येकी दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अंमलदार कुमार जाधव, अमित भरते, अर्चना मोटे आणि प्रतीक पवार यांनी खटल्याच्या पाठपुराव्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
You must be logged in to post a comment.