पटसंख्येबाबत वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्याचे आदेश; ‘भूमिशिल्प’च्या वृत्तांताची दखल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेच्या शाळांमधील घटती पटसंख्या आणि त्यांच्या भवितव्याचा प्रश्न ‘साप्ताहिक भूमिशिल्प’ने ‘खर्च भरघोस तरी नगरपालिकेच्या शाळा ओस!’ या मथळ्याखाली आकडेवारीसह मांडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या वृत्ताची दखल घेतली आहे. नगरपालिका शाळांबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नाईकवडी यांनी नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
प्राथमिक शिक्षण विभागाने आज बुधवारी २२ जुलै रोजी याबाबत लेखी पत्र काढले आहे. ‘साप्ताहिक भूमिशिल्प’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने सातारा नगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या शाळांबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे घटत्या पटसंख्येचा प्रश्न आता प्रशासकीय पातळीवरही ऐरणीवर आला आहे.
‘भूमिशिल्प’ने वृत्तातून नगरपालिकेच्या १८ शाळांमधील १ हजार ३६५ विद्यार्थ्यांची पटसंख्या, ७४ शिक्षक, काही शाळांमधील अत्यल्प विद्यार्थीसंख्या, शासनाचे पदनिश्चितीचे निकष आणि शाळांच्या सक्षमीकरणाची गरज याकडे लक्ष वेधले होते. पटसंख्या वाढीसाठी विशेष प्रवेश मोहीम, पालकांशी थेट संवाद, आधुनिक सुविधा आणि जिल्हा परिषदेच्या धर्तीवर ‘स्मार्ट शाळा’ संकल्पना राबविण्याची आवश्यकताही स्पष्ट करण्यात आली होती.
दरम्यान, उद्या गुरुवारी सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होत आहे. शिक्षण विभागानेही या गंभीर प्रश्नाची दखल घेतल्याने आता सर्वसाधारण सभेत नगरपालिका शाळांच्या घटत्या पटसंख्येचा विषय चर्चेला येणार का, नगरसेवक यावर आवाज उठविणार का आणि शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्यास भाग पाडणार का, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.
‘भूमिशिल्प’च्या वृत्ताची दखल घेऊन अहवाल मागविण्यात आला असला, तरी आता ही कार्यवाही केवळ अहवालापुरती मर्यादित न राहता नगरपालिका शाळांच्या सक्षमीकरणासाठी ठोस कृतीत रूपांतरित होणार का, हाच खरा प्रश्न आहे.
You must be logged in to post a comment.