६४ लाखांचे अंमली पदार्थ जैव कचऱ्याच्या भट्टीत

जिल्हाभरात पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल नष्ट

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील विविध १४ पोलिस ठाण्यांमध्ये दाखल १७ गुन्ह्यांतील तब्बल ५०९ किलो वजनाचा आणि ६४ लाख १३ हजार १४७ रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. गांजा, गांजाची झाडे आणि अफूच्या झाडांचा समावेश असलेला हा मुद्देमाल अंमली पदार्थ नाश समितीच्या देखरेखीखाली कराड येथील जैव कचरा निर्मूलन प्रकल्पाच्या भट्टीत नष्ट करण्यात आला.

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ नाश समिती कार्यरत आहे. या समितीमध्ये सातारा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष शिंदे, पोलिस उपअधीक्षक (गृह) कृष्णकुमार जाधव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

जिल्ह्यातील १४ पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण १७ गुन्ह्यांतील अंमली पदार्थांच्या मुद्देमालाबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. संबंधित मुद्देमालाचे इन्व्हेंटरी पंचनामे तसेच रासायनिक विश्लेषण प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. यामध्ये निकाल लागलेल्या गुन्ह्यांतील मुद्देमालाचाही समावेश होता. सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ६४ लाख १३ हजार १४७ रुपये किमतीचा सुमारे ५०९ किलो गांजा, गांजाची झाडे आणि अफूची झाडे नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, गणेशखिंड, पुणे येथील रासायनिक विश्लेषक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक तसेच दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत कराड हॉस्पिटल असोसिएशनच्या जैव कचरा निर्मूलन प्रकल्पातील भट्टीमध्ये हा अंमली पदार्थांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.पोलिस अधीक्षक तथा अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष निखिल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष शिंदे, पोलिस उपअधीक्षक (गृह) कृष्णकुमार जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक रासायनिक विश्लेषक श. भा. गटकळ, अर्चना जगदाळे, वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक डी. व्ही. तेलंग आणि जैव कचरा निर्मूलन प्रकल्पाचे व्यवस्थापक राहुल पवार उपस्थित होते.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला आणि इरफान मुलाणी यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!