२६८ कोटींच्या कामांना मंजुरी; गुणवत्तेशी तडजोड नको : ना. शिवेंद्रसिंहराजे

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या जतन-संवर्धनासह संगम माहुलीतील ऐतिहासिक समाधीस्थळांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. अजिंक्यताऱ्यासाठी १३४ कोटी ८० लाख, तर संगम माहुलीसाठी १३२ कोटी ९५ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. सुमारे २६८ कोटी रुपयांची ही दोन्ही कामे वेगाने हाती घेऊन उत्कृष्ट दर्जाची करावीत. गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन, संवर्धन व परिसर सुशोभीकरण तसेच संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार व परिसर विकासाच्या कामांचा मंत्री भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.
बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विश्वास सातपुते, पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, उपअभियंता रवीकुमार अंबेकर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अजिंक्यतारा आणि संगम माहुली येथील बांधकामांची निविदा एकत्रित काढण्याच्या सूचना भोसले यांनी दिल्या. अजिंक्यतारा किल्ल्यावर विविध ठिकाणी पायवाटा विकसित करण्यात येणार आहेत. रात्री वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेऊन प्रकाश केवळ पायवाटांवर पडेल, अशा पद्धतीची प्रकाशयोजना करावी. संवर्धनाच्या कामातून निधी शिल्लक राहिल्यास खिंडीतील गणपती मंदिरापासून अजिंक्यतारा किल्ल्यापर्यंत पायवाट तयार करण्याचाही विचार करावा. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
संगम माहुलीतील कामांचा आढावा घेताना प्रवेशद्वारापासून गावापर्यंतचा रस्ता काँक्रिटचा करून त्याची रुंदी वाढविण्याचे निर्देश भोसले यांनी दिले. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चर्चा करावी. संगम माहुली येथे पार्किंगची व्यवस्था करावी, गावातील सर्व गटारे बंदिस्त करावीत आणि प्रवेशद्वारावरील कमान आकर्षक नव्या रचनेनुसार उभारावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजिंक्यतारा आणि संगम माहुली येथील कामे करताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये. सातारा शहरातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील, अशा उत्कृष्ट दर्जाची ही दोन्ही कामे करावीत, असे निर्देशही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिले.
You must be logged in to post a comment.