भरपावसात युवकांचे साताऱ्यात ‘जंतर मंतर’

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांना मोर्चाने पाठिंबा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद गुरुवारी साताऱ्यातही उमटले. भर पावसाची तमा न बाळगता विद्यार्थी आणि युवक रस्त्यावर उतरले. युनायटेड यूथ फ्रंटच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या मोर्चात सुमारे १५० हून अधिक युवक-युवती सहभागी झाले. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. भर पावसात घोषणाबाजी करत विद्यार्थी शाहू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचले. ‘विद्यार्थ्यांना न्याय द्या’, ‘शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार थांबवा’ अशा आशयाचे फलक हातात घेत युवक-युवतींनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

शाहू चौकात झालेल्या सभेत दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा वक्त्यांनी तीव्र निषेध केला. नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भर पावसातही युवक-युवतींची लक्षणीय उपस्थिती राहिल्याने आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

‘वंचित’च्या बंदला संमिश्र प्रतिसाद

दरम्यान, नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला साताऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फिरून व्यापारी आणि व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. शहरातील काही भागांत व्यवहार सुरळीत सुरू होते, तर काही व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!