संघर्ष, साधना आणि योगदानाची राज्यस्तरावर दखल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : नृत्यकलेवरील निष्ठा, सातत्यपूर्ण साधना आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून साताऱ्याच्या नृत्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या सूरज वसंत दयाळ यांच्या कलाप्रवासाला राज्यस्तरीय सन्मानाची मोहोर उमटली आहे. नृत्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना २०२६ च्या राज्यस्तरीय ‘नृत्यजीत पुरस्काराने’ गौरविण्यात आले. पुणे येथील जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन आणि आशुतोष डान्स स्टुडिओज यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुण्यातील वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात दयाळ यांनी वडिलांसमवेत विशिष्ट सेवा पदक विजेते एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र पोलिस दलातील निवृत्त डेप्युटी कमिशनर शहाजीराव पाटील, आयोजक आशुतोष संकायेपाटील, निर्माता अभिजीत संकायेपाटील, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, गौरवी सारंग यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
साताऱ्याच्या नृत्यविश्वात सूरज दयाळ यांनी आपल्या कलेबरोबरच मनमिळाऊ स्वभावाने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी नृत्याची साधना अखंड सुरू ठेवली. कलेवरील निष्ठा, सातत्य आणि सहकलाकारांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे नृत्य क्षेत्रात त्यांच्याविषयी आपुलकी आहे. त्यांच्या या संघर्षमय वाटचालीची आणि नृत्य क्षेत्रातील योगदानाची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याने साताऱ्याच्या नृत्य क्षेत्रातून आनंद व्यक्त होत आहे.
दयाळ यांच्या या यशाबद्दल खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेविका मोनिका घोरपडे, अनिता घोरपडे, मयुर सोशल ग्रुपचे अध्यक्ष संतोष जाधव, अशोक घोरपडे, रवी घोरपडे, बाळकृष्ण शिंदे निलेश घोरपडे, प्रशांत येवले, प्रशांत उबाळे, मनोज लिंगडे, शहाजी पाटील, सुमित साठे, प्रसाद नारकर, कल्याण राक्षे, नंदकुमार बागडे, सुधीर साळुंखे, मोनिश अवघडे, अक्षय सावंत, ऋषिकेश परदेशी आणि राहुल निकम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
नटराजाची सेवा करण्याचे बळ मिळाले : सूरज दयाळ
‘‘माझ्या नृत्यप्रवासाची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याचा आनंद आहे. वडिलांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारता आला, हा क्षण माझ्यासाठी विशेष आहे. या सन्मानामुळे शेवटच्या श्वासापर्यंत नटराजाची सेवा करण्याचे बळ मिळाले आहे.’’
- सूरज दयाळ, नृत्यकलावंत
You must be logged in to post a comment.