खंडित वीजपुरवठ्याबाबत ‘एसएमएस’ सुविधेची मागणी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : पाऊस सुरू झाला की वीज जाणार, हे जणू आता सातारकरांच्या अंगवळणी पडले आहे. महावितरणला फोन करावा तर ‘व्यस्त आहे,’ हा संदेशही ठरलेलाच; परंतु वीजपुरवठा कशामुळे खंडित झाला आहे, तो कधी सुरळीत होईल, याबाबत माहितीही मिळू शकत नसल्याने वीजग्राहक संतप्त आहेत. यासंदर्भात सविस्तर माहिती देणारी ‘एसएमएस’ सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्राप्त माहितीनुसार, ज्या शहरांमध्ये भूमिगत वीजवाहिन्या नाहीत, तिथे पावसामुळे झाडे अथवा फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळतात आणि वीजपुरवठा खंडित होतो. साताऱ्यात वळीवाचा किंवा पावसाळ्यातील पहिला पाऊस पडल्यावर अशी स्थिती उद्भवते. बुधवारी (दि. १३) साताऱ्यात हीच परिस्थिती होती. ‘महावितरण’कडून चौकशीसाठी लँडलाइन क्रमांक देण्यात आला आहे. तो सतत ‘व्यस्त’ असतो, अशी नागरिकांची तक्रार आहे. आजकाल अनेकजण ‘वर्क फ्रॉम होम’ करतात. शिवाय, तीव्र उन्हाळ्यात पंखे, कूलर अत्यंत आवश्यक ठरतात. परंतु वीजपुरवठा कोणत्या कारणाने खंडित झाला आहे आणि कधी पूर्ववत होणार, याबाबत माहितीच मिळत नसल्याने कामांचे नियोजन करणे अशक्य होते. या परिस्थितीचा फटका व्यापारी वर्गालाही मोठ्या प्रमाणावर बसतो.
आजकाल हवामानाचा अंदाज, पावसाचा अंदाज वर्तविणारे ‘एसएमएस’ थेट मंत्रालयातून येतात. अशी सुविधा स्थानिक पातळीवर ‘महावितरण’ का देऊ शकत नाही, असा नागरिकांचा सवाल आहे. वीज वितरण कंपनी जर आम्हाला ‘ग्राहक’ म्हणत असेल, वीजबिले वेळेवर वसूल केली जात असतील तर माहितीच्या बाबतीत ग्राहकांना अंधारात का ठेवले जाते, अशी चर्चा ऐकायला मिळते. संदेशवहन क्षेत्रात एवढी क्रांती होऊनसुद्धा ‘महावितरण’ अजूनही लँडलाइनच्या जमान्यात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. तसेच, वीजवाहिन्यांना धोकादायक ठरणाऱ्या झाडांचे सर्वेक्षण आणि फांद्यांची छाटणी वेळेवर करण्यात काय अडचण आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जातो.
‘महावितरण’ने स्थानिक पातळीवर मोबाईल क्रमांकाचा डेटाबेस तयार करून ‘एसएमएस’ प्रणाली तातडीने कार्यान्वित करावी आणि वीजपुरवठा खंडित होण्यास कारणीभूत असलेला बिघाड, त्याचे ठिकाण, दुरुस्तीची प्रक्रिया तसेच त्यासाठी आवश्यक असलेला कालावधी अशी माहिती ग्राहकांना कळवावी, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.
दरम्यान, पुढील पावसाळ्यापर्यंत काही नवी वीज उपकेंद्रे सुरू होणे अपेक्षित आहे. येत्या वर्षभरात एमआयडीसी, मेडिकल कॉलेज आणि पॉवर हाऊस परिसरात तीन उपकेंद्रे सुरू होणार आहेत. त्यामुळे एखाद्या ठिकाणी बिघाड झाल्यास सर्वच ठिकाणी वीजपुरवठा खंडित न होता, तेवढाच परिसर अंधारात जाईल, अशी माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली.
“अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यांमुळे झाडे, फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळणे, खांब किंवा वायर तुटण्याच्या घटना घडतात. अशा वेळी महावितरणची स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा तांत्रिक बिघाड अचूक ओळखून तत्काळ वीजप्रवाह खंडित करते. हा वीजपुरवठा जाणीवपूर्वक बंद केला जात नसून संभाव्य दुर्घटना, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी ही आवश्यक सुरक्षा प्रक्रिया असते. तसेच येत्या सहा महिन्यांत साताऱ्यात तीन नवीन उपकेंद्रे उभारली जाणार असून त्यामुळे वीजभार कमी होऊन वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींवर नियंत्रण मिळवण्यास आणि नागरिकांचा त्रास कमी करण्यास मदत होईल.”
- डॉ.अमित बारटक्के,कार्यकारी अभियंता, महावितरण.
You must be logged in to post a comment.