वसुलीसाठी पालिका आक्रमक; थकबाकी भरण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा नगरपालिकेने विक्रमी वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. मंगळवारी वसुली विभागाने रविवार पेठ व परिसरातील सहा गाळे थकबाकीमुळे सील केले. या गाळ्यांवर एकूण २१ लाख ९७ हजार रुपयांची थकबाकी आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
रविवार पेठेतील शाहू क्रीडा संकुलाच्या बाहेर असलेल्या चार गाळ्यांवर १२ लाख १० हजार ६०५ रुपयांची थकबाकी होती. याशिवाय सदर बाजार परिसरातील प्रमोद चक्के यांच्या मालकीच्या दोन मिळकतीही सील करण्यात आल्या. या मिळकतींवर अनुक्रमे ४ लाख २६ हजार ५१४ व ५ लाख ६० हजार ८२ रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.

पालिकेच्या वसुली मोहिमेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, त्यात वॉरंट अधिकारी अतुल दिसले, वरिष्ठ लिपिक गणेश तालीम, अक्षय कोळपे, मुकेश वायदंडे, विजय पवार यांचा समावेश आहे. तसेच कर अधिकारी उमेश महादर, लिपिक राजाराम लगड, मिलिंद सहस्त्रबुद्धे, जगदीश मुळे, उत्तम कोळी, तुषार माहुलकर, तेजस साखरे, रवी भाग्यवंत, गणेश पवार, भारत चौधरी, पियुष यादव यांच्या पथकांनी कारवाईत भाग घेतला.
दरम्यान, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी मिळकतधारकांना थकबाकी वेळेत भरण्याचे आवाहन केले असून, अन्यथा जप्तीची कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे.

You must be logged in to post a comment.