रुंदीकरणाचा दुसरा टप्पा माझ्या घरापासूनच : अमोल मोहिते

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : शहरातील रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमण हटाव मोहिमेवरून सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी अपात्रतेची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. गुरुवार पेठेतील स्वतःची मिळकत प्रस्तावित रस्ता रुंदीकरणात जात असतानाही नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर करून स्वतःचे अतिक्रमण हटविले नाही, तसेच मोहीम हेतुपुरस्सर दुसऱ्या भागात राबवून स्वतःचे घर वाचविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील रुंदीकरण मोहीम माझ्या घरापासूनच सुरू होईल. माझे घर बाधित होत असल्यास ते हटविण्यात माझाच पहिला क्रमांक असेल, असे स्पष्ट प्रतिपादन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केले आहे.
सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी २०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीतील नामनिर्देशनपत्रात गुरुवार पेठेतील घराचा पत्ता नमूद केला आहे. सातारा नगरपालिकेने ५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार नगरपरिषद इमारत ते बोगदा परिसर या मार्गाचे पहिल्या सुधारित विकास योजनेत तसेच शासनाकडे मंजुरीसाठी सादर दुसऱ्या सुधारित विकास आराखड्यात १५ मीटर रुंदीकरण प्रस्तावित आहे. गुरुवार पेठेतील संबंधित मिळकतही या रुंदीकरणात बाधित होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच नगरपालिकेने २१ मे रोजी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली; मात्र माची पेठेकडून मोहीम सुरू करण्याऐवजी समर्थ मंदिर चौक ते बोगदा परिसरातच कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षक भिंती व बांधकामांवर कारवाई झाली; मात्र नगराध्यक्षांच्या घराकडील भाग वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. स्वतःचे घर वाचविण्यासाठीच कारवाईचा प्राधान्यक्रम बदलण्यात आला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर केल्याचा दावा करत महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १६ व ४४ अन्वये त्यांना अपात्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीबाबत बोलताना नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी कोणताही पक्षपात झालेला नसल्याचे स्पष्ट केले. समर्थ मंदिर चौक परिसरातील मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन त्या भागातील अतिक्रमण हटाव मोहिमेला प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने वाढीव बांधकामाचा भाग काढून प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे पहिला टप्पा सुरळीतपणे पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
शाहू चौक ते बोगदा या मार्गावरील पहिल्या टप्प्यानंतर आता अदालत वाडा परिसरासह पुढील भागातील रुंदीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच राबविण्यात येणार असून, संबंधित बाधित मिळकत धारक आणि अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
स्वतःच्या घरासंदर्भातील आक्षेपांवर बोलताना मोहिते म्हणाले, प्रशासनाच्या नोंदींनुसार माझे घर रस्ता रुंदीकरणात बाधित होत असल्याचे स्पष्ट झाल्यास ते हटविण्यात माझाच पहिला क्रमांक असेल. नियम सर्वांसाठी समान आहेत. नगराध्यक्ष म्हणून मी स्वतःसाठी वेगळा निकष लावणार नाही.
श्री.मोरे यांच्या तक्रारीनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेतील समान निकषांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढे कोणती प्रशासकीय प्रक्रिया राबविली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
You must be logged in to post a comment.