गिरिकन्या धैर्याने काबीज केले युनाम शिखर

प्रतिकूल वातावरणात ६१११ मीटर उंचीवर फडकावला झेंडा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) :सर केले एव्हरेस्ट बेस कॅम्प… किलीमंजारो… माऊंट एलब्रुस… आणि आता युनाम शिखर… ही कामगिरी म्हणजे ‘धैर्यं सर्वेषु कालेषु आवश्यकम्’ अशीच. फक्त नावानेच नव्हे, तर कर्तबगारीनेही धैर्य दाखवत सातारची ‘अजिंक्यकन्या’ धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने शिखर सर करण्याची धुरंधर कामगिरी केली आहे. एकाधिक शिखरे सर करणारी अवघ्या १४ वर्षांची धैर्या आता गिर्यारोहण क्षेत्रात निष्णात, कुशल आणि प्रवीण म्हणजेच धुरंधर बनत आहे.

साताऱ्याचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवणाऱ्या धैर्याची ही कामगिरी सातारकरांना अभिमान वाटावा अशीच आहे. बालपणात डोंगर, कपारी आणि शिखरे चढण्याची आवड निर्माण झालेल्या धैर्याचा प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी धैर्याने आव्हानात्मक असलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याचा विडा उचलला. ही मोहिम सर करताना प्रचंड शारीरिक बदलांना तिला सामोरे जावे लागले. त्या वेदना एक महिला किंवा युवतीच समजू शकते. तरीही त्या वेदना ‘पोटात’ घेऊन धैर्याने ५ हजार ५४५ मीटर इतकी उंची गाठत एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिम यशस्वीपणे पूर्ण केली. पालकांशिवाय ही मोहिम फत्ते करणारी ती बहुधा देशातील एकमेव अल्पवयीन मुलगी ठरली.

धैर्या येथेच थांबली नाही, ती पुन्हा झेपावली आणि आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमंजारो सर केले. तब्बल ५ हजार ८५० मीटर इतकी उंची असलेले हे शिखर तिने अनेक आव्हानांवर मात करत सर केले. उणे ५ ते ६ अंश सेल्सिअस तापमान, बर्फ, थंडी, ऑक्सिजनची कमतरता आणि रात्रीचा प्रवास अशा प्रतिकूल परिस्थितीत तिने हे शिखर सर केले.

दोन शिखरे सर करून थांबेल ती धैर्या कसली!

कॉकेशस पर्वतरांगेत असलेले युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रुस हेही तिने सर केले. ५ हजार ६४२ मीटर उंचीचे हे शिखर तिने काही महिन्यांपूर्वी सर केले. जागतिक स्तरावर युद्धाचे परिणाम पाहायला मिळत असल्याने परदेशातील शिखर सर करण्याच्या मोहिमा सध्या जिकीरीच्या झाल्या आहेत. त्यामुळे धैर्याने यातही न थांबता भारतातील शिखरे सर करण्याचा चंग बांधला आहे.

गत महिन्यात हिमाचल प्रदेशातील फ्रेंडशिप शिखर सर करण्यासाठी धैर्या सरसावली होती. ५ हजार २८९ मीटर म्हणजेच १७ हजार ३५२ फूट उंचीचे हे शिखर सर करण्यासाठी अवघे ३०० ते ४०० मीटर अंतर बाकी असताना खराब हवामान आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे तिला माघार घ्यावी लागली.मात्र, त्या मोहिमेतून मनाशी खूणगाठ बांधत लगेचच फ्रेंडशिप शिखरापेक्षाही मोठे आणि अधिक आव्हानात्मक असलेले युनाम शिखर सर करण्याचे धाडस तिने दाखवले. तब्बल ६ हजार १११ मीटर म्हणजेच २० हजार ४९ फूट इतक्या उंचीचे हे शिखर तिने नुकतेच सर केले. दि. २२ मे रोजी ही मोहिम सुरू करत तिने दि. ५ जूनपर्यंत ती पूर्णत्वास नेली. गिर्यारोहण क्षेत्रात धैर्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

हिमाचल प्रदेशातील पीर पंजाल पर्वतरांगेत, मनालीपासून पुढे आणि बारालाचा ला खिंडीजवळ युनाम शिखर आहे. ६ हजार मीटरपेक्षा अधिक उंच असलेले हे शिखर सर करणे ही तांत्रिक कौशल्याधिष्ठित मोहिम मानली जाते. गिर्यारोहकांसाठी हे लोकप्रिय शिखर आहे.धैर्याने आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक डॉ. हेमंत लिऊआ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेमुळे युनाम शिखर सर केले. डॉ. सुरभी लिऊआ यांनी धैर्याला फ्रेंडशिप शिखर सर करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

गेली सहा वर्षे सातत्याने ट्रेकिंग आणि गिर्यारोहणाचा सराव करत असलेल्या धैर्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. धैर्याला प्रियांका मोहिते, कैलास बागल आणि डॉ. शीतल बेबले यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. धैर्या सध्या साताऱ्यातील गुरुकुल शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे.

सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि शिक्षिका सौ. ज्योती कुलकर्णी यांची ती कन्या आहे. अल्पवयात सातत्याने जागतिक स्तरावरील शिखरे सर करत धैर्या कुलकर्णी साताऱ्याच्या नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान बनली आहे.

आसमान तलक रास्ता बनाना है…!

अपयशाने खचून जाणे सोपे असते; पण त्याच अपयशाला यशाच्या पायरीत रूपांतरित करणे हे खऱ्या जिद्दीचे लक्षण असते. फ्रेंडशिप पीक मोहिमेत शिखर अवघ्या ३०० ते ४०० मीटर अंतरावर असताना खराब हवामानामुळे धैर्याला माघार घ्यावी लागली. शिखर डोळ्यांसमोर असूनही ते सर करता न आल्याची खंत तिच्या मनात होती. मात्र, तिने त्या वेदनेला निराशेचे रूप न देता नव्या उमेदीत बदलले. थांबायचे नाही, आणखी उंच भरारी घ्यायची, हा निर्धार मनाशी बाळगत धैर्याने अधिक कठीण आणि अधिक उंच अशा ६१११ मीटर उंच युनाम शिखरावर यशस्वी चढाई केली.फ्रेंडशिप पीकवरील अपूर्ण स्वप्नानेच तिला युनामच्या शिखरापर्यंत पोहोचण्याची ताकद दिली. फ्रेंडशिप शिखर १७ हजार फूट आणि लगेच युनाम २० हजार ४९ फूट, अवघ्या एका दिवसाच्या फरकाने ‘बॅक टू बॅक’ आव्हानात्मक चढाई करणे, ही धैर्याची कामगिरी केवळ शिखर सर करण्यापुरती मर्यादित नाही; तर अपयशावर मात करून स्वप्नांना नवी दिशा देणाऱ्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.

धरासे चढकर गगन को छुआ…

“पोटच्या गोळ्याला आकार देण्याचे कर्तव्य आम्ही करत आहोत, तर आई-बाबांनी दिलेले नाव सार्थक करण्याचे कर्तव्य ती पार पाडत आहे. आता केवळ विनोद आणि ज्योती कुलकर्णी यांची कन्या अशी तिची ओळख राहिलेली नाही, तर तिने स्वतःची ‘अजिंक्यकन्या’ आणि ‘शिखरकन्या’ अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘धरासे चढकर गगन को छुआ…’ अशी धैर्याची कामगिरी असून, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” अशी प्रतिक्रिया धैर्याचे वडील विनोद कुलकर्णी आणि आई सौ. ज्योती कुलकर्णी यांनी दिली.

error: Content is protected !!