महाबळेश्वर आगारातील वाहतूक निरीक्षक खान निलंबित

अपशब्दप्रकरणी पत्रकार संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर कारवाई

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाबळेश्वर बसस्थानकावर पत्रकारांबाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी महाबळेश्वर आगारातील वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घटनेविरोधात सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा शहर पत्रकार संघ आणि डिजिटल मिडिया परिषद यांनी आक्रमक भूमिका घेत विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांची भेट घेऊन निषेध नोंदवत निवेदन दिले. पत्रकार संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर एसटी प्रशासनाने तत्काळ कारवाईचा निर्णय घेतला.

रविवारी महाबळेश्वर येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला होता. बस उशिरा सुटल्याच्या कारणावरून प्रवासी, पत्रकार आणि संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वादादरम्यान वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांनी पत्रकारांबाबत अपशब्द वापरले. संबंधित पत्रकाराने केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणातून हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाभरातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली.

या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा शहर पत्रकार संघ आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांची भेट घेत संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली. पत्रकारांशी अशा प्रकारचे वर्तन अस्वीकार्य असून सार्वजनिक सेवेतील अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यावर विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित वाहतूक निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना प्रवासी व पत्रकारांशी सौजन्यपूर्ण आणि संयमित वर्तन ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी उमेश भांबरे, ज्ञानेश्वर भोईटे, चंद्रकांत देवरुखकर, गजानन चेंणगे, प्रवीण शिंगटे, सिद्धार्थ लाटकर, विशाल कदम, अमित वाघमारे, अमोल निकम, कैलास मायणे, निनाद बाजारे यांच्यासह पत्रकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

“सातारा जिल्ह्यातील कोणत्याही अधिकृत पत्रकाराशी विनाकारण गैरवर्तन अथवा अपशब्द वापरण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. पत्रकारांचा स्वाभिमान दुखावणाऱ्यांविरोधात पत्रकार संघटना ठामपणे उभी राहील. गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यासही मागे-पुढे पाहिले जाणार नाही. आजच्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर झालेली निलंबनाची कारवाई हा समस्त जिल्ह्यातील पत्रकारांच्या एकजुटीचा विजय आहे. पत्रकारांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

  • हरीश पाटणे, अध्यक्ष, सातारा जिल्हा पत्रकार संघ तथा अध्यक्ष, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती

“महाबळेश्वर येथे पत्रकारांबाबत घडलेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पत्रकारांशी अशा प्रकारचे वर्तन अयोग्य असून, घडलेला प्रकार चुकीचा आहे. प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.”

  • ज्योती गायकवाड, विभाग नियंत्रक
error: Content is protected !!