भाजपची प्रतिमाच मलिन; ‘ही तर प्रवृत्तीविरोधातील लढाई’ : अभयसिंह जगताप

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा-सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण एका मंत्र्यांच्या कार्यपद्धतीमुळे दूषित झाले असून, त्यांच्या वागणुकीमुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे, अशी टीका सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केली. ही निवडणूक एखाद्या व्यक्तीविरोधातील नसून अन्यायकारी राजकीय प्रवृत्तीविरोधातील असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना विकासनिधीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत जगताप म्हणाले, “नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीतील पदाधिकाऱ्यांना विकासकामांसाठी निधी दिला जात नाही. १५ ते २० हजार लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दुजाभावाची वागणूक मिळत असेल, तर तो लोकशाहीसाठी घातक प्रकार आहे.” टेंडर प्रक्रियादेखील केंद्रीकृत करण्यात आल्याने स्थानिक विकासकामांवर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.या निवडणुकीत सरळ लढत होणार असून, एकूण ८९५ मतांपैकी किमान ५०० मते मिळविण्याचे लक्ष्य महाविकास आघाडीने ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांच्या राजकारणामुळे भाजपविरोधात वातावरण निर्माण झाले असून, विरोधी पक्षांबरोबरच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक स्थानिक प्रतिनिधींमध्येही नाराजी असल्याचा दावा त्यांनी केला.महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते ठामपणे आपल्या पाठीशी असल्याचे सांगताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचे पाठबळ असल्याचे नमूद केले.
“ही निवडणूक आव्हानात्मक असून पैशांचा प्रभाव दिसू शकतो; मात्र मी विचारांच्या आधारावर मते मागणार आहे. भाजपविरोधी भूमिका असलेले तसेच अन्याय झाल्याची भावना असलेले अनेक सदस्य स्वाभिमानाच्या या लढाईत साथ देतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असूनही काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. यावेळीही तसाच निकाल लागेल, असा दावा करत त्यांनी माणदेशातील नेते शेखर गोरे हे भाजप नेतृत्वावर नाराज असल्याचे सांगितले. “आम्ही दोघेही माणदेशी सुपुत्र आहोत. त्यामुळे त्यांची साथ मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला तानाजी वायदंडे, प्रशांत गोडसे, नितीन घाडगे आदी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.