पिसाळलेल्या कोल्ह्यांचा करवडी भागात वावर

शिवारात काम करणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर हल्ला

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ऐन शेतीच्या हंगामात करवडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पिसाळलेल्या कोल्ह्यांची दहशत निर्माण झाली आहे. भटकी, खंडोबा आणि काळवट परिसरात कोल्ह्यांनी दोन ग्रामस्थांवर हल्ला करून चावा घेतल्याने भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तीन ते चार कोल्हे या परिसरात फिरत असून, वन विभागाने त्यांना पकडण्यासाठी शिवारात शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र, दाट झाडी, डोंगराळ भाग आणि पावसामुळे अद्याप कोल्ह्यांना पकडण्यात यश आलेले नाही.

सध्या शेतीची पावसाळी कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांची शिवारात वर्दळ वाढली आहे. अशातच कोल्ह्यांनी हल्ले करण्याच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. भटकी, खंडोबा आणि काळवट परिसरात त्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दोन ग्रामस्थांना कोल्ह्यांनी चावा घेतल्याने या प्रकाराचे गंभीर्य वाढले आहे.

या प्रकाराची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर पथक तातडीने परिसरात दाखल झाले. वन अधिकारी आणि अमित डुबल यांच्या सहकार्याने संपूर्ण शिवारात कोल्ह्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, परिसरातील घनदाट झाडी, डोंगराळ भूप्रदेश आणि पावसाचा अडथळा यामुळे शोधमोहिमेत अडचणी येत आहेत. एकापेक्षा अधिक कोल्ह्यांचा वावर असल्याने वन विभागासमोरील आव्हानही वाढले आहे.

दरम्यान, कोल्ह्यांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी शेतात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, एकट्याने शिवारात जाऊ नये तसेच कोल्हा आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न न करता तातडीने वन विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!