दूध भेसळखोरांची पावले कराड तालुक्यापर्यंत!

शामगावात छापा; पती-पत्नीला रंगेहाथ अटक

कराड, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अन्न व औषध प्रशासनाने कराड तालुक्यात दूध भेसळीविरोधात मोठी कारवाई केली. शामगाव येथे एका घरात रिफाइंड पामोलिन तेल आणि संशयास्पद पांढऱ्या पावडरीचा वापर करून म्हशीचे कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पथकाने उघडकीस आणला. रविवारी (ता. २६) सायंकाळी साडेआठच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात संबंधित दाम्पत्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून, भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य व उपकरणांसह ६ हजार ९७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शामगाव येथील अंकनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या यशवंत फाटक यांच्या घरात म्हशीचे कृत्रिम दूध तयार केले जात असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी वंदना विठ्ठल रूपनवर यांना मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सापळा रचून अचानक छापा टाकला. कारवाईदरम्यान महेश यशवंत फाटक (वय ४४) व त्यांची पत्नी स्वाती महेश फाटक (वय ३८) हे कृत्रिम दूध तयार करत असल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात केशरी रंगाच्या किटलीतील सुमारे तीन लिटर आणि गुलाबी रंगाच्या किटलीतील सुमारे दोन लिटर म्हशीच्या दुधामध्ये रिफाइंड पामोलिन तेल व संशयास्पद पांढरी पावडर मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावरून मिक्सर व त्याचे भांडे, हँड ब्लेंडर तसेच भेसळीसाठी वापरले जाणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या कृत्रिम दुधासह पामोलिन तेल आणि संशयास्पद पांढऱ्या पावडरीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासणीत हे पदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक व असुरक्षित असल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या कृत्रिम दुधाची विक्री अथवा पुरवठा नेमका कुठे आणि किती प्रमाणात केला जात होता, याचाही तपास सुरू आहे.

या प्रकरणी मसूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, संबंधित पती-पत्नीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार आणि अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रूपनवर यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.

आता शोध साखळीचा…

या कारवाईनंतर केवळ शामगावातील भेसळीपुरता तपास मर्यादित न ठेवता पामोलिन तेल आणि संशयास्पद पांढरी पावडर नेमकी कोठून आणली जात होती, याचा माग काढण्यात येत आहे. संबंधितांनी या पदार्थांच्या पुरवठादारांची माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने यामागे दूध भेसळीची मोठी साखळी कार्यरत आहे का, याचाही शोध अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून घेतला जात आहे.

error: Content is protected !!