
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, माजी मंत्री स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, दि. ४ रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याजवळील स्मृतिस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम होईल. यानंतर सोनवडी-गजवडी येथे खो-खो स्पर्धा , सकाळी १०.३० वाजता रिमांड होम सातारा येथे मुलांना मिष्टान्न भोजन वाटप , ११ वाजता पंचायत समिती सातारा येथे स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे.
दुपारी १ वाजता कळंबे (ता. सातारा) येथील सुविद्या माध्यमिक विद्यालयात राष्ट्रवादी सेवा दलातर्फे खाऊ वाटप तर दुपारी ३ वाजता कल्याण पार्क, विलासपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सायंकाळी ६.३० वाजता गांधी मैदान, राजवाडा येथे प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे (पुणे) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तसेच, सायंकाळी ७ वाजता कल्याण पार्क, विलासपूर येथे ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांचे कीर्तन होईल.
याशिवाय, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, विविध विकास सेवा सोसायट्या व इतर संस्थांमध्ये अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You must be logged in to post a comment.