देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत मान्याचीवाडीचा विकास मंत्र उलगडणार!

सरपंच रविंद्र माने यांची देगावमध्ये शनिवारी खास मुलाखत

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): गेल्या दोन दशकांपासून सातत्याने विकासाच्या नवनवीन शिखरावर पोहोचलेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची प्रेरणादायी यशोगाथा प्रथमच सार्वजनिकरीत्या उलगडली जाणार आहे. कायमस्वरूपी करमाफी, मोफत वीज आणि पाणीपट्टी माफ या अभिनव संकल्पनांसह देशातील आदर्श ग्रामपंचायतींपैकी एक ठरलेल्या या गावाचे सरपंच रविंद्र माने हे शनिवारी १ फेब्रुवारी रोजी देगाव (सातारा) येथे प्रकट मुलाखतीतून ग्रामपंचायतीच्या यशोगाथेचा प्रवास मांडणार आहेत.

सातारा तालुक्यातील देगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्प अंतर्गत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ ते ७:३० या वेळेत पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव हे सरपंच रविंद्र माने यांची मुलाखत घेणार आहेत.

२००० सालापासून गावाच्या सर्वांगीण विकासात अव्वल स्थान पटकावणाऱ्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला आजवर ७८ हून अधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. प्रत्येक शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभागातून विविध विकासकामे आणि शाश्वत पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे ही ग्रामपंचायत देशभरात नावाजली गेली आहे.

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या पुढाकाराने देगाव गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या प्रयत्नांना सरपंच रविंद्र माने यांचे मार्गदर्शन लाभणार असून, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे आणि सरपंच वैशाली साळुंखे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!