कर्जमाफीची दुसरी यादी १५ ऑगस्टपूर्वी शक्य

पात्र शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही : जिल्हाधिकारी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची सातारा जिल्ह्यात पारदर्शक आणि गतिमान अंमलबजावणी सुरू असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी दुसरी यादी १५ ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. कर्जमाफीच्या प्रक्रियेत कोणत्याही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देत प्रशासनाकडून आवश्यक सर्व कार्यवाही वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले की, योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आतापर्यंत ५२ हजार ६६२ शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी ३१ हजार ५५६ पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांचा समावेश असलेली दुसरी यादी १५ ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेपेक्षा माफीची रक्कम कमी असणार नाही. शासनाच्या निकषांनुसार एकरकमी सेटलमेंट (One Time Settlement) करून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही संभ्रमाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी व इतर बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून सर्व बँकांमध्ये योजनेची माहिती देणारे फलक लावण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या मयत शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज आहे, त्यांच्या वारसांनाही योजनेचा लाभ मिळावा यासाठी संबंधित कर्जखाती वारसांच्या नावावर वर्ग करण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे. यासोबतच पात्र लाभार्थ्यांना नव्याने पीक कर्ज मिळण्यास अडचणी येऊ नयेत, यासाठी बँकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, वारसा प्रमाणपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत जिल्ह्यातील तलाठ्यांनाही निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यात ९० टक्के ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाली असून, अद्याप ४ हजार ८१२ शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. भविष्यातील सर्व शासकीय योजनांचा लाभ थेट आणि सुरळीत मिळण्यासाठी उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

error: Content is protected !!