सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेला उदयनराजे गटाची दांडी

बनकरांचा आक्षेप; ‘राजें’च्या समन्वयानंतरही धुसफूस

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेला खासदार उदयनराजे भोसले समर्थक नगरसेवक उपस्थित राहणार नाहीत. मागील सर्वसाधारण सभेत आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडून स्पष्ट भूमिका घेणे अपेक्षित होते. संबंधितांना समज देऊन अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असतानाही गेल्या आठवड्यातील स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा वादाचा प्रकार घडला. त्यातच मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय आजच्या सभेपुढे येत असल्याने सभेला उपस्थित न राहण्याची भूमिका घेतल्याचे उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांनी ‘भूमिशिल्प’शी बोलताना स्पष्ट केले.

मागील सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. विषयांचे वाचन न करता मंजुरी दिली जात असल्याचा आक्षेप घेत खंदारे यांनी बनकर यांच्या कार्यपद्धतीवर ‘हुकूमशाही’चा आरोप केला होता. या आरोपांबाबत नगराध्यक्षांनी स्पष्ट भूमिका घेणे अपेक्षित होते, असे बनकर यांचे म्हणणे आहे. नगरपालिकेचे कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी ज्या प्रकारांमुळे सभागृहात वाद निर्माण होतात, त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधितांना समज देणे आवश्यक होते, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

दरम्यान मागील सभेतील वादानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेतील मतभेदांची दखल घेतली होती. दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठकांनंतर नगरसेवकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. जुन्या आघाड्यांमधील मतभेद आणि कुरघोड्या बाजूला ठेवून सर्वांनी समन्वयाने शहराच्या विकासासाठी काम करावे, अशा सूचना दोन्ही नेत्यांनी नगरसेवकांना दिल्या होत्या.

मात्र, त्यानंतरही गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला आणि उदयनराजे समर्थक सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी समन्वयाच्या सूचना दिल्यानंतरही पालिकेतील मतभेद पूर्णपणे मिटले नसल्याचे पुन्हा समोर आले. या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याचाही बनकर यांनी आक्षेप नोंदविला आहे.

आजच्या सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय सुरुवातीलाच येणार आहे. मागील सभेत आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत स्पष्टता झालेली नसताना त्या सभेचे इतिवृत्त कायम करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे योग्य नसल्याची भूमिका बनकर यांनी घेतली आहे. त्यामुळे आपण आणि उदयनराजे समर्थक नगरसेवक आजच्या सभेला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दोन्ही राजेंनी हस्तक्षेप करून एकत्रित आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्यानंतरही स्थायी समितीत पुन्हा झालेला वाद आणि आता सर्वसाधारण सभेला उदयनराजे गटाने अनुपस्थित राहण्याचा घेतलेला निर्णय यामुळे सातारा पालिकेतील अंतर्गत मतभेद पुन्हा ऐरणीवर आले आहेत. आजच्या सभेत या अनुपस्थितीचे नेमके काय पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!