गजबजलेल्या खण आळीत रहस्यमय वस्तूंमुळे खळबळ

मद्य-मांसासह पूजासाहित्य आढळल्याने जादूटोण्याचा संशय

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील गजबजलेल्या खणआळी चौक परिसरात रविवारी पहाटे रिक्षा स्टँडजवळील मोकळ्या जागेत ठेवण्यात आलेल्या पातेल्यात मांसाहारी अन्नपदार्थ, मद्याची बाटली, सिगारेट, लिंबू, पूजेसाठी वापरण्यात येणारे साहित्य, चाव्या आणि अन्य काही वस्तू आढळून आल्या. हे साहित्य नेमके कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंधश्रद्धाविरोधी चळवळीचे प्रणेते आणि जादूटोणाविरोधी कायद्याचे जनक दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शहरातच हा ‘उतारा’ आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

रविवारी सकाळी रिक्षाचालक आणि स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले. शहराच्या मध्यवर्ती आणि कायम वर्दळ असलेल्या परिसरात असे साहित्य सार्वजनिक ठिकाणी आढळल्याने नागरिकांमध्ये कुतूहल आणि संभ्रम निर्माण झाला. या प्रकारामागे नेमका कोणता उद्देश होता, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ, मद्याची बाटली आणि अन्य साहित्य उघड्यावर ठेवणे स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

खणआळी चौक परिसर अत्यंत गजबजलेला असून येथून दररोज महिला, युवक-युवतींसह मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा असते. अशा सार्वजनिक ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार घडत असतील तर ते गंभीर आहे. आजच्या तरुण पिढीने यातून नेमका कोणता आदर्श घ्यायचा? प्रत्येकाने स्वतःच्या कर्तृत्वावर, मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवून आयुष्यात पुढे गेले पाहिजे. अशा चुकीच्या प्रकारांनी कोणाचेही भले होत नाही. नागरिकांनी अंधश्रद्धांना बळी पडू नये, असे आवाहन जांभळे यांनी केले.

दरम्यान, शहरातील सार्वजनिक आणि गजबजलेल्या ठिकाणी अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्यास त्याची तपासणी करून हे साहित्य कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले, याचा शोध घेण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

error: Content is protected !!