रात्री दहानंतर ‘कैलास’ बंदच राहणार!

शिस्त पाळण्यासाठी स्मशानभूमी व्यवस्थापनाचा निर्णय

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मृत्यू ही अटळ गोष्ट आहे आणि अंत्यसंस्कार हा त्या व्यक्तीचा शेवटचा सन्मानपूर्वक विधी असतो. मात्र, त्यासाठीदेखील एक शिस्त आवश्यक आहे. संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमी गेली २२ वर्षे अखंडपणे सेवा देत असून, सातत्याने सुरू असलेली ही सुविधा कोरोना काळातही बंद पडली नाही. मात्र, सध्या अंत्यसंस्कारासाठी रात्री उशिराने येणाऱ्या नागरिकांमुळे कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी स्मशानभूमी व्यवस्थापनाने सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत अंत्यसंस्कार पूर्ण करण्याच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सातारा, कोरेगाव आणि १५ ग्रामपंचायतींमधील नागरिकांसाठी कैलास स्मशानभूमी ही अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे. श्री बालाजी ट्रस्ट व लोकसहभागातून ही स्मशानभूमी उभारण्यात आली असून, गेल्या ८०३० दिवसांत म्हणजेच २२ वर्षात एकही दिवस ती बंद ठेवण्यात आलेली नाही. कोरोना काळात मृतदेहांच्या संख्येत दहापटीने वाढ झाली असतानाही स्मशानभूमीतील सेवा अबाधित राहिली. सध्या येथे सात कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत असून, स्मशानभूमीची स्वच्छता, देखभाल आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. स्मशानभूमीसारख्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी मिळणे तसेच त्यांना टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान आहे. एक कर्मचारी सोडून गेला तर दुसरा मिळणे कठीण असते. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांची मानसिकता जपत त्यांना शक्य होईल एवढ्याच वेळेत सेवा घेणे गरजेचे असल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

वादाचे वाढते प्रसंग

अंत्यसंस्कारासाठी रात्री १० नंतर येणाऱ्या मृतदेहांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा नागरिक फोन करून रात्रीच अंत्यसंस्कार करण्याची विनंती करतात. पण अशा वेळी, कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतो. रात्री १० वाजता मृतदेह आल्यास पूर्ण विधी उशिरा संपतो. कर्मचाऱ्यांना घरी जाऊन अंघोळ करून जेवण करायला रात्रीचे १२ वाजतात. परिणामी, त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनही विस्कळीत होते. रात्री १० नंतर अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली नाही तर काही नागरिक गैरसमज करून घेतात. काही वेळा कर्मचारी व नागरिकांमध्ये वाद होतात. कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ, दडपण यांना सामोरे जावे लागते.

व्यसने आणि अस्वच्छता

अंत्यसंस्कारासाठी रात्री उशिरा येणाऱ्या काही नागरिकांकडून गुटखा, तंबाखू सेवन करून स्मशानभूमीत थुंकण्याच्या घटना वाढल्या आहेत. रात्री कर्मचाऱ्यांच्या नजरेतून हे सुटत असल्याने सकाळी या जागांची स्वच्छता करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर येते. एकीकडे स्मशानभूमी पवित्र आणि शांततेचे ठिकाण असते, तिथेच अशा अस्वच्छ वर्तनामुळे पवित्रतेला धक्का बसतो.

स्मशानभूमीतील सेवा कर्तव्यभावनेतून अखंड सुरू राहावी, स्मशानभूमीची स्वच्छता आणि पवित्रता टिकावी आणि कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा त्रास टळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सातारा व कोरेगाव परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करावे व अंत्यसंस्कार वेळेत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्री बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, संजय कदम, जगदीश खंडेलवाल, नितीन माने, अंबाजी देसाई, उदय गुजर, हरिदास साळुंखे, जगदीप शिंदे, दीपक मेहता, संतोष शेंडे यांनी केले आहे.

“कैलास स्मशानभूमी ही संपूर्ण समाजाच्या सहकार्याने उभारलेली आहे. गेली २२ वर्षे आम्ही निस्वार्थ भावनेने सेवा देत आहोत. मात्र, शिस्तीचे पालन होणे आवश्यक आहे. रात्री उशिरा अंत्यसंस्कार झाल्यास कर्मचाऱ्यांना अडचणी येतात. त्यांच्या मानसिकतेची जाणीव ठेवून नागरिकांनी वेळेचे पालन करावे. स्मशानभूमी ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि तिच्या पवित्रतेचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे.”

  • श्री. राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट
error: Content is protected !!