कोडोलीच्या राजकारणातील प्रभावशाली पर्व संपले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): कोडोली (ता. सातारा) गावचे सुपुत्र, खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांचे निष्ठावान सहकारी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी ऊर्फ प्रदीप साळुंखे (वय अंदाजे ६०) यांचे शनिवारी (ता. २४) पहाटे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कोडोलीसह संपूर्ण सातारा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रवी साळुंखे हे मूळचे छायाचित्रकार. त्यांनी काही काळ वृत्तपत्र क्षेत्रात छायाचित्रकार म्हणून काम केले होते. मात्र, समाजकारण आणि स्थानिक राजकारणातील आस्था लक्षात घेता त्यांनी राजकारणात प्रवेश केला. गेली तब्बल ३७ वर्षे ते कोडोली जिल्हा परिषद गटात सक्रीय होते. त्यांनी ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा परिषद उपाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास खंबीर नेतृत्वाने केला.त्यांनी सातारा पंचायत समितीवर कोडोली गणाचे सदस्य व विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. नंतर जिल्हा परिषदेवर निवड होऊन उपाध्यक्षपद भूषविले. तसेच बांधकाम समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह उभे राहिले, हे त्यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच कोडोली बाजारपेठेने शोकमौन पाळत दुकाने बंद ठेवली. संगममाहूली येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम यात्रेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या मागे आई, पत्नी, एक भाऊ, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे . त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्यातील स्थानिक राजकारणातील एक प्रभावी पर्व संपुष्टात आले, असे बोलले जात आहे.
You must be logged in to post a comment.