खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश; गरजूंना मिळणार हक्काचे घर

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यासाठी तब्बल ४५ हजार ४२२ घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. ही जिल्ह्यातील गरजू व पात्र लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्रासाठी उच्चांकी उद्दिष्ट निश्चित करताना सातारा जिल्ह्याला लक्षणीय वाटा मिळाला आहे. गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.
खासदार उदयनराजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेली प्रधानमंत्री आवास योजना गरीब, वंचित आणि गरजू कुटुंबांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेंतर्गत शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागात पंचायत समितीमार्फत कार्यवाही केली जाते. केंद्र सरकारकडून सुमारे २ लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते, ज्यामुळे गरजूंना कर्ज घेऊन घरकुल बांधण्यास मोठी मदत होते.
सातारा जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ४५ हजार ४२२ घरकुलांच्या उद्दिष्टामुळे अनेक पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने ठोस नियोजन करावे, असे निर्देश खासदार उदयनराजे यांनी दिले आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी या योजनेचा नियमित आढावा घ्यावा व पात्र लाभार्थ्यांची निवड काटेकोरपणे करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचवले आहे.
महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याला आणि विशेषतः सातारा जिल्ह्याला ही योजना मोठी संधी ठरणार आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे.संबंधित प्रशासनाने ही योजना अधिकाधिक गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी जलद आणि काटेकोरपणे अंमलात आणावी, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

You must be logged in to post a comment.