अभिनेता राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावर उदयनराजे भोसले संतापले

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत मराठी अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या विधानामुळे सध्या संताप व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन केलं जात असून नाक घासून माफी मागावी अशी मागणी होत असतानाच दिल्ली येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपला तीव्र निषेध नोंदवला आहे. अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजेत, महापुरुषांबद्दल अशी विधानं करणाऱ्यांना ‘जनतेने दिसेल तिथे ठेचून काढलं पाहिजे’ तसेच अशांना गोळ्या घातल्या पाहिजे,असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभारात लोकांचा सहभाग व्हावा म्हणून विचार मांडल्याचे स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, लोकशाहीत आपण वावरतो त्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे. त्यांनी कधी स्वत:चा स्वार्थ पाहिला नाही. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना आपलं कुटुंब मानलं. त्यांनी कधी तत्वाशी तडजोड केली नाही. असं असताना अनेकजण त्यांच्याबद्दल अशी गलिच्छं विधानं करतात. टीव्हीवर ते पाहत असताना मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना झाल्या, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले, हा सोलापूरकर कोण आहे? अशा लोकांना लाच पलीकडे काही समजत नाही, लावली जीभ टाळ्याला असा हा प्रकार आहे. अशा लोकांच्या जिभा हासडल्या गेल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधानं करणाऱ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचून काढलं पाहिजे. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जाती धर्मात जे तेढ निर्माण होतं ते अशा विकृत लोकांमुळे होतं.
‘शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. विकृत विधाने करणाऱ्यांना फिल्म इंडस्ट्रीजमधील लोकांनी थारा दिला नाही पाहिजे. मला वाटंत त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे, असेही उदयनराजे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. जे अशी विधानं करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले.
दरम्यान अभिनेता सोलापूरकरच्या विधानानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली असून, विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी सोलापूरकर यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले, निषेध मोर्चे काढण्यात आले. यावेळी महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील वातावरण अधिक तापले असून, सोलापूरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राहुल सोलापूरकर यांनी नेमकं काय विधान केलं होतं?
एका पॉडकास्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत वादग्रस्त विधान करत म्हटले, “पेटारे-बिटारे काहीच नव्हतं. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले. त्यांनी औरंगजेबाच्या वकीलाला आणि बायकोला लाच दिली. औरंगजेबाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं पत्र महाराजांनी घेतलं आणि तो परवाना दाखवून महाराज आग्र्यातून बाहेर पडले.”

You must be logged in to post a comment.