प्रशासन आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. गॅस पाईप बसवणाऱ्या एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे मंगळवारी दुपारच्या दरम्यान सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला भगदाड पडले, परिणामी मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर वाहून गेले आणि संपूर्ण परिसर जलमय झाला. या निष्काळजीपणाचा फटका आता संपूर्ण शहराला बसणार आहे, कारण बुधवार दि. ५ फेब्रुवारी रोजी साताऱ्यातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या दुर्घटनेनंतर जीवन प्राधिकरण विभागाकडून पाईप दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. मात्र, दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य पुण्याहून मागवावे लागत असल्याने हे काम पूर्ण होण्यासाठी १० ते १५ तास लागणार आहेत. त्यामुळे सदर बझार, गोडोली, शाहूनगर, केसरकर पेठ, करंजे, पोवई नाका, एस.टी. स्टँड परिसर, जिल्हा परिषद परिसर या भागांमध्ये पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या नकाशाची माहिती न घेता गॅस पाईपलाइन टाकण्याचे काम कसे सुरू करण्यात आले? यासाठी संबंधित विभागाकडून परवानगी घेतली होती का? जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई केली जाणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे हजारो नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.जीवन प्राधिकरणाने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले असले, तरी या गंभीर निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन आणि गॅस पाईपलाईन एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, आणि याविषयी अद्याप ठोस उपाययोजना जाहीर झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

You must be logged in to post a comment.