पर्यावरण दिनी सातारकरांचा ‘विकास हवा; वृक्षतोड नकोच’ चा नारा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधत ‘विकास हवा; वृक्षतोड नकोच’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी साताऱ्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सातारकर वृक्षप्रेमी यांच्या वतीने आयोजित ही दिंडी शुक्रवार, दि. ५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते राजवाडा या मार्गावर काढण्यात येणार आहे.
घनदाट वृक्षसंपदा, हिरवाई आणि पर्यावरणपूरक ओळख असलेल्या साताऱ्यात विकासकामांच्या वाढत्या गरजांबरोबरच पर्यावरण संवर्धनाचाही विचार होणे आवश्यक असल्याची भावना या उपक्रमामागे आहे. शहराच्या विकासाला विरोध नसला, तरी विकास करताना निसर्गाचा समतोल अबाधित राहावा, वृक्षतोडीऐवजी वृक्षसंवर्धनाला प्राधान्य मिळावे आणि शहर नियोजनात पर्यावरणीय मूल्यांचा समावेश व्हावा, हा सकारात्मक संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
या वृक्षदिंडीत अभिनेते व पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे, ज्येष्ठ अभिनेते विजय निकम, विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव न्यायाधीश, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ, फिरते पथक वनक्षेत्रपाल गणेश महांगडे, सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा उपक्रम केवळ प्रतीकात्मक न राहता पर्यावरण संवर्धनाच्या जनचळवळीला अधिक बळ देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अलीकडच्या काळात शहरातील विविध विकास प्रकल्पांदरम्यान संभाव्य वृक्षतोडीच्या मुद्द्यावर जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत अनेक वृक्ष वाचविण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याच सामाजिक जाणीवेचा विस्तार म्हणून या वृक्षदिंडीकडे पाहिले जात आहे.
धर्म, जात, पंथ, भाषा, विचार आणि राजकारण यांपलीकडील सामाजिक बांधिलकी जपत ‘निसर्ग सर्वोच्च’ या भावनेतून शहरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वृक्षदिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन सातारकर वृक्षप्रेमी यांनी केले आहे.
You must be logged in to post a comment.