सह्याद्रीवरील पर्यावरणविरोधी प्रकल्प रोखणार : सयाजी शिंदे

पर्यावरण दिनानिमित्त सातारकर वृक्षप्रेमींची वृक्षदिंडी उत्साहात

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : “सातारकरांनी तब्बल ४६ झाडे वाचवून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे. साताऱ्याला जणू झाडे वाचविण्याची ‘नशा’ लागली आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. सह्याद्रीवर लादले जाणारे पर्यावरणविरोधी प्रकल्प मानवासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे अशा प्रकल्पांविरोधातील संघर्ष सुरूच ठेवणार आहोत,” असा स्पष्ट इशारा अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिला.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सातारकर वृक्षप्रेमींच्या वतीने साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘वृक्षदिंडी’मध्ये ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, ॲड. वर्षा देशपांडे, सातारा नगरपालिकेचे शहर विकास नियोजन सभापती अशोक शेडगे, अभिनेते संतोष पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

या वृक्षदिंडीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर वरच्या रस्त्याने, राजपथ मार्गे राजवाडा येथील गोलबाग परिसरात दिंडीची सांगता झाली. संपूर्ण मार्गावर पर्यावरण संवर्धनाचा जागर अनुभवायला मिळाला. मोठ्या संख्येने वृक्षप्रेमी महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक या दिंडीत सहभागी झाले होते.

‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘विकास हवा; वृक्षतोड नकोच’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पालखीच्या पुढे भजनी मंडळातील सदस्य भजन म्हणत चालत असल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. भजनाच्या तालावर दिंडी पुढे सरकत असताना वृक्षप्रेमी महिला-पुरुषांनी फुगडी घालत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. सहभागी वृक्षप्रेमींनी अंगावर झाडांच्या प्रतिमा असलेले तसेच ‘@ सातारकर’ असे लिहिलेले फलक परिधान केले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या विविध घोषणा व संदेशफलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी बोलताना सयाजी शिंदे यांनी सातारकर वृक्षप्रेमींच्या कार्याचे विशेष कौतुक केले. झाडे तोडण्याऐवजी त्यांचे ‘ट्रान्सप्लांटेशन’ (स्थलांतर) करण्यावर भर दिला पाहिजे. १०, १५ किंवा ३० वर्षांत मोठी झालेली झाडे सहज तोडली जातात; मात्र ती पुन्हा उभी राहण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे अधिकारी, कंत्राटदार आणि प्रशासनाने झाडांचे महत्त्व समजून संवेदनशीलतेने निर्णय घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी रस्ता विकासाच्या कामांमध्ये शक्य तितकी झाडे वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. “रस्ता विकास करताना जी झाडे वाचविता येतील, ती निश्चितपणे वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. वड, पिंपळ, उंबर, पिंपरण यांसारख्या काही झाडांच्या ‘री-प्लांटेशन’ला परवानगी देण्यात आली असून, केवळ तोड हा एकमेव पर्याय नाही,” असे त्यांनी सांगितले.

पर्यावरण कार्यकर्त्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी झाडतोडीवरील कारवाई अधिक कठोर करण्याची मागणी केली. “मोठ्या झाडाची किंमत लाखोंमध्ये असताना केवळ हजार रुपयांचा दंड हा अत्यंत तुटपुंजा आहे. झाडतोडीवरील दंड किमान ५० हजार रुपये असावा. झाडाच्या वयानुसार त्याऐवजी झाडे लावण्याची सक्ती झाली पाहिजे. साताऱ्याची हिरवाई हीच शहराची ओळख असून ती अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष सुरूच राहणार आहे,” असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, वृक्षदिंडीतून पर्यावरण रक्षणासाठी प्रशासन, नागरिक आणि वृक्षप्रेमींनी हातात हात घालून काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. साताऱ्याची ‘ग्रीन सिटी’ म्हणून असलेली ओळख जपण्याचा निर्धार यावेळी सहभागी वृक्षप्रेमींनी व्यक्त केला.

error: Content is protected !!