साताऱ्यात घरकुल सोहळ्यात मोठी घोषणा; कर्जमाफीचेही संकेत

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राने विक्रमी कामगिरी करत एका वर्षात तब्बल पाच लाख घरांची उभारणी पूर्ण केली असून, पुढील वर्षी आणखी १५ लाख घरांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी साताऱ्यात केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात ३० जूनपूर्वी निर्णय, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर मदत, कांदा व ऊस उत्पादकांना दिलासा, तसेच महिलांच्या ‘लखपती दीदी’ अभियानाला अधिक वेग देण्याचे संकेतही त्यांनी दिले.
येथील सैनिक स्कूल मैदानावर आयोजित राज्यस्तरीय घरकुल वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०१६ ते २०२२ या कालावधीत राज्याला १२ लाख ९० हजार घरांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यानंतर नव्या सर्वेक्षणात आणखी ३० लाख घरांची गरज समोर आली. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून, पुढील दोन ते तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे वितरण केले जाणार आहे. राज्य सरकार प्रत्येक घरकुलासाठी अतिरिक्त ५० हजार रुपयांची मदत देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सौरऊर्जेसाठी अनुदान देण्याचाही निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “ऊर्जा बचत आणि स्वावलंबी घरव्यवस्था हे सरकारचे ध्येय आहे,” असेही ते म्हणाले.
शेतकरी प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असून केंद्र सरकारच्या मदतीने त्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साखर उद्योग आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवरही केंद्रीय स्तरावर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. राज्य सरकार कर्जमाफीबाबत सकारात्मक असून ३० जूनपूर्वी यासंदर्भात घोषणा करण्याची तयारी सुरू आहे, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र प्रोत्साहनपर मदतीचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देताना फडणवीस म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत राज्यातील ५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्यात यश आले असून हा आकडा एक कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. महिलांना बचत गटांद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्राच्या ग्रामविकास यंत्रणेचे कौतुक करताना, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रत्येकाला पक्के घर’ या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे सांगितले.
पुढील वर्षी १५ लाख घरांच्या वितरणासाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार असून, सर्वसामान्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ग्रामविकास योजनांसाठी ९ हजार कोटी रुपयांच्या निधीचे प्रतीकात्मक धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्राला मिळालेल्या ३० लाख घरांच्या उद्दिष्टापैकी पाच लाख घरांचे विक्रमी वितरण प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांतून पूर्ण झाल्याचे सांगितले. “महाराष्ट्रात एकही नागरिक बेघर राहणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ग्रामविकास विभाग झटत राहील,” असे ते म्हणाले.

दरम्यान, विक्रमी वेळेत पाच लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामविकास विभाग, तत्कालीन सचिव आणि मंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष कौतुक केले. “घरकुल उद्दिष्टपूर्तीचे शिवधनुष्य त्यांनी समर्थपणे पेलले,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी गौरव केला.
महायुतीतील नेत्यांचा ‘एकजिनसी’ संदेश
जिल्हा परिषद सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेतील राजकीय तणावाच्या चर्चांना उधाण आले असतानाच, साताऱ्यातील घरकुल सोहळ्यात मात्र महायुतीचा एकजिनसी चेहरा पाहायला मिळाला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सैनिक स्कूल हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री देसाई यांनी परस्पर अनौपचारिक भेट घेत पुष्पगुच्छांची देवाणघेवाण केली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री देसाई आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी एकाच वाहनातून रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
उदयनराजेंची उपस्थिती; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
साताऱ्याच्या सक्रिय राजकारणात काही काळ तुलनेने अलिप्त दिसणारे खासदार उदयनराजे भोसले हेही घरकुल सोहळ्याच्या व्यासपीठावर आवर्जून उपस्थित राहिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेत हस्तांदोलन करत संवाद साधला. दीर्घ काळानंतर मोठ्या जाहीर कार्यक्रमात उदयनराजेंची उपस्थिती दिसल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा रंगली.
घरकुल सोहळ्यात ‘जया भाऊं’ची छाप
राज्यातील ग्रामविकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे यांची प्रशासनावर पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र या कार्यक्रमातून दिसून आले. काटकसरीचे, नेटके नियोजन आणि घरकुल अभियानाचा आक्रमक पाठपुरावा यामुळे साताऱ्यातील या सोहळ्यावर ‘जया भाऊं’ची स्पष्ट छाप उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
You must be logged in to post a comment.