लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

साताऱ्यात जल्लोष; उदयनराजेंकडून अण्णाभाऊंच्या साहित्याची भेट

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारानगरीचा थाट, नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती, जल्लोषी वातावरण आणि आतषबाजीच्या साक्षीने सातारा नगर परिषदेने शाहू चौकात उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमास केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार सुनील कांबळे, आमदार अमित गोरखे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर, नगरसेवक तसेच स्मारक समितीचे सदस्य, सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रती भेट देऊन स्वागत केले.

दरम्यान, सैनिक स्कूल मैदानावर आयोजित घरकुल वितरण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि लोकचळवळीतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “अण्णाभाऊ साठे म्हणत असत की, ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर तोललेली नसून ती कामगारांच्या कष्टावर उभी आहे. समाजरचनेत कामगारांचे योगदान मोठे असून या लोकचळवळीच्या ऊर्जाकेंद्राला मी मनापासून अभिवादन करतो,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

या पुतळा अनावरण सोहळ्यामुळे साताऱ्यात सामाजिक व सांस्कृतिक अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

error: Content is protected !!